भांडवली बाजारात आज गुरुवारी मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३८० अंकांनी घसरला होता.एकीकडे बाजारात घसरण सुरु असताना झी एंटरटेन्मेटचा शेअर १८ टक्क्यांनी वधारला होता.

तसेच आजच्या सत्रात झी, जिंदाल स्टील, सन टीव्ही, ग्लेनमार्क, टाटा पाॅवर, अदानी पाॅवर, ओबेराय रियल्टी, आयडीबीआय या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

एबीबी, व्होल्टास, एल अॅंड टी हाऊसिंग फायनान्स या मिडकॅप शेअरमध्ये घसरण झाली आहे. दरम्यान झी एंटरटेन्मेटचा शेअर १८ टक्क्यांनी वधारला होता. त्याला आज अप्पर सर्किट लागले.

तो इंट्रा डे मध्ये ३०७.२५ रुपयांवर गेला होता. सध्या तो १७.४२ टक्क्यांनी वधारला असून ३००.६५ रुपयांवर आहे. इन्व्हेस्कोशी सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत झी एंटरटेन्मेटची सरशी झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात झी एंटरटेन्मेटने इन्व्हेस्को विरोधात केलेला अपिल जिंकला. याशिवाय इन्व्हेस्कोने झी एंटरटेन्मेट विरोधात केलेल्या तक्रारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज झी एंटरटेन्मेटच्या शेअरमध्ये मोठी खरेदी दिसून आली.