नवी दिल्ली : आयपीएल 2022, 26 मार्च पासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता सर्व संघांचे खेळाडू हळू हळू एकत्र येत आहेत. आयपीएल सुरु होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांसाठी आश्चर्य करणारी एक बातमी आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहल आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार झाला आहे. होय, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राजस्थान रॉयल्सने ही माहिती दिली आहे.
युझवेंद्र चहल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या मजेशीर ट्विटसाठी ओळखला जातो. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. युझवेंद्र चहलने आता आपली फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचे अकाऊट ‘हॅक’ केले आहे.
युजवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने स्वतःला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार बनवले आहे. याशिवाय, 10 हजार रिट्विट मिळाल्यास तो जॉस बटलरसोबत सलामीला उतरेल, असेही ट्विटमध्ये लिहिले आहे. राजस्थान रॉयल्सने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
वास्तविक, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आहे. आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारा कोचिंग स्टाफचे नेतृत्व करत आहे. यावेळी लसिथ मलिंगाही राजस्थान रॉयल्सच्या स्टाफमध्ये सामील झाला आहे. राजस्थानचा पहिला सामना 29 मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.