मुंबई : प्रसिद्ध युट्युबर भुवन बाम त्याच्या नवीन व्हिडिओमुळे अडचणीत आला आहे. भुवनने आपल्या व्हिडीओमध्ये पहाडी महिलांवर भाष्य केलं होतं. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, व्हिडिओवरून झालेल्या वादावर महिला आयोगाच्या कारवाईनंतर भुवनने आता जाहीरपणे माफी मागितली आहे.

यूट्यूबर भुवन बामने अलीकडेच त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘बीबी की वाइन्स’वर ‘ऑटोमॅटिक बाईक’ या शीर्षकासह एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यांनतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्हिडिओमध्ये पहाडी महिलांवर अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच अनेकांनी भुवनवर टीका केली होती. हे प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांना कॉमेडियनविरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती केली होती.

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पोस्टनंतर भुवनने जाहीर माफी मागित लिहिले, “माझ्या व्हिडिओच्या त्या भागामुळे काही लोकांचं मन दुखावल्याची माहिती मला मिळाली आहे. मी व्हिडिओ एडिट करून तो भाग काढून टाकला आहे. जे मला ओळखतात त्यांनाही माहीत आहे की मी महिलांचा किती आदर करतो. या व्हिडीओद्वारे कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी सर्वांची माफी मागतो.”