मुंबई : सिनेसृष्टी दिसायला बाहेरून खूप सुंदर दिसते. मात्र यातील एक काळ आणि घाणेरडे सत्य म्हणजे कास्टिंग काऊच. हे सत्य आज आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. रोज कोणती ना कोणती अभिनेत्री या कास्टिंग काऊचबद्दल समोर येऊन बोलताना, वेगवेगळे खुलासे करताना दिसत आहे. यातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता केसवानी हिने कास्टिंग काऊचबद्दल मौन सोडले आहे.

नुकतंच श्वेताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला कास्टिंग काऊचबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मी बॉलिवूडमधील काही चित्रपटात काम केले आहे. पण काही चित्रपट मी अर्ध्यावर सोडले कारण त्या चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान मला सांगण्यात आले होते की, तुला आऊटडोअर शूटसाठी एकटीला यावे लागेल. तेव्हा मी फक्त १८ वर्षांची होते. तेव्हा मी माझ्या आईसोबतच शूटींगसाठी जायचे. पण त्यावेळी मला सांगण्यात आले की तुला आईऐवजी एकट्याने प्रवास करावा लागेल.”

“त्यासोबतच मला असेही सांगण्यात आले की तुला निर्मात्यांसोबत चांगले संबंध ठेवावे लागतील. दिग्दर्शकाच्या आज्ञा तुला पाळाव्या लागतील. ज्यावेळी मला अशा अटी घातल्या जायच्या त्यानंत मी ते चित्रपट करण्यास नकार द्यायची. मी या सगळ्यासाठी कधीही तयार झाली नाही. म्हणूनच मी चित्रपटांमध्ये कमी झळकली. माझ्यासोबत अनेक चित्रपटांदरम्यान हे घडले आणि त्यामुळेच मी छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. कारण त्यावेळी छोट्या पडद्यावर काहीही कास्टिंग काऊचसारखा प्रकार घडला नव्हता.” असेही श्वेता यावेळी म्हणाली.

दरम्यान, श्वेता केसवानीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘अभिमान’, ‘कहानी घर-घर की’ आणि ‘देश में निकला होगा चांद’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तर सध्या ती हॉलिवूडमध्ये तिचे नशीब आजमवताना दिसत आहे.