मुंबई : लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) मार्गदर्शक गौतम गंभीरने दीपक हुडा आणि कृणाल पांड्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरच्या मते, चांगली कामगिरी करण्यासाठी मित्र असणं गरजेचं नाही.
देशांतर्गत सामन्यांदरम्यान कृणाल पांड्या आणि दीपक हुडा यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे या खेळाडूंमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. बडोद्याकडून खेळणाऱ्या दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपूर्वी २०२१ मध्ये संघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्याने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप दीपक हुडाने केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, कृणाल पांड्याने त्याला त्याचे करिअर संपवण्याची देखील धमकी दिली होती.
मात्र, आता हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स या एकाच संघाकडून खेळताना दिसणार आहेत. आयपीएल लिलावादरम्यान, दोन्ही खेळाडू लखनौ सुपर जायंट्स संघाने विकत घेतले आणि अशा परिस्थितीत दोघेही एकाच ड्रेसिंग रूमचा भाग असतील.
चांगली कामगिरी करण्यासाठी मित्र असणं गरजेचं नाही
लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनी म्हटले आहे की, खेळाडूंना कामगिरी करण्यासाठी त्यांच्यात चांगली मैत्री असणे आवश्यक नाही. पीटीआयशी संवाद साधताना गंभीर म्हणाला, “जर तुम्हाला परफॉर्म करायचा असेल तर तो तुमचा चांगला मित्र असण्याची गरज नाही. हे दोन्ही खेळाडू व्यावसायिक आहेत आणि त्यांना त्यांचे काम कसे करायचे हे माहित आहे. जर तुम्ही एकाच संघाकडून खेळत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला रोज एकत्र जेवायला जावे लागेल. मी कोणत्याही संघासाठी खेळलो त्याचा मी चांगला मित्र नव्हतो. पण त्याचा माझ्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. ते परिपक्व खेळाडू आहेत आणि त्यांना माहित आहे की त्यांचे काम सामने जिंकणे आहे.”