मुंबई : कर्नाटकातून सुरू झालेला हिजाब वाद वाढतच चालला आहे. देशभरात या वादाचे वेगवेगळे परिणाम झालेले दिसत आहेत. यात काही दिवसांपूर्वी कर्नाटक हायकोर्टाने यावर निकाल देत हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग मानण्यास नकार दिला. त्यानंतर या निकालावर बराच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. या संदर्भात डिबेट होत असून अनेक नेत्यांच्या आणि कलाकारांच्या प्रतिक्रिया या निर्णयावर घेतल्या जात आहेत. यातच आता मिस युनिव्हर्स हरनाझ कौर संधूनेही या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हरनाझ संधू नुकतीच एका कार्यक्रमानिमित्त मुंबईत होती. यावेळी एका पत्रकाराने तिला हिजाबच्या वादावर प्रश्न विचारला आणि या विषयावर तिची प्रतिक्रिया विचारली. हरनाझच्या टीमच्या वतीने रिपोर्टरला फक्त हरनाझचं करिअर, संघर्ष आणि यशाबद्दलच प्रश्न विचारण्यात यावेत, कोणतेही राजकीय प्रश्न विचारू नयेत, असं सांगितलं गेलं. परंतु तरीही रिपोर्टरने पुन्हा हरनाझला या विषयावर प्रतिक्रिया विचारली.

यावर खुद्द हरनाझने रिपोर्टरला प्रश्न केला आणि म्हणाली, “तुम्ही नेहमी मुलींना का टार्गेट करता?, जसं तुम्ही अजूनही मला टार्गेट करत आहात. प्रत्येक मुलीला जसं जगायचं आहे, तसं तिला जगू द्या, तिला गगनात भरारी घेऊ द्या, तिला आयुष्यात जे करायचंय ते करू द्या. तुम्ही तिचे पंख कापू नका. तुम्हाला पंख कापायचे असतील तर तुमचे कापा, तिची प्रगती थांबवू नका,” असं ती म्हणाली. दरम्यान, हिजाबच्या वादात हरनाझचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.