मुंबई : काही दिवसांपूर्वी 2022च्या ऑस्कर सोहळ्यात ऑस्‍कर अवॉर्ड्स सुरू असताना कॉमेडियन क्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवल्याने, विल स्मिथने संतापून क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर सगळ्यांना धक्काच बसला आहे. मात्र, या प्रकरणानंतर आता विल स्मिथवर अकादमीने कारवाई सुरू केली आहे. यामुळे विल अडचणीत आला आहे.

अकादमीकडून या घटनेनंतर असे स्पष्टीकरण देण्यात आले होते की अशाप्रकारच्या घटना स्विकारल्या जाणार नाहीत आणि विल स्मिथविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, त्यानंतर आता अकादमीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या घटनेनंतर विल स्मिथला कार्यक्रमातून बाहेर जाण्यास सांगितले होते. मात्र विल स्मिथने तसे करण्यास नकार दिला होता, असेही अकादमीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, या घटनेच्या एका दिवसानंतर, म्हणजे 28 मार्च रोजी, अकादमीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ते विल स्मिथच्या कृतीचा निषेध करते. “आम्ही अधिकृतपणे घटनेचा आढावा सुरू केला आहे आणि आम्ही पुढील कारवाई करू. आमचे नियम, मानके आणि कॅलिफोर्निया कायद्यानुसार निकालापर्यंत पोहोचले जाईल.” आता या प्रकरणात अकादमी विल विरोधात काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.