मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी आपल्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. आता त्याच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. धोनीच्या या निर्णयामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. आता चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्यामागचे मुख्य कारण उघड केले आहे.
चेन्नई टीमचे सीईओ काशी विश्वनाथन एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “धोनीने सीएसकेचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे, धोनी जे काही करतो ते सीएसकेचे हित लक्षात घेऊनच करतो. त्याने जो काही निर्णय घेतला त्यात आम्ही आनंदी आहोत. धोनी जडेजाकडे कर्णधारपद सोपवत आहे आणि धोनी संघासोबत खेळणार आहे, त्यामुळे बाँडिंग कायम राहील.”
त्याचवेळी, रवींद्र जडेजाला कर्णधार बनवल्याबद्दल ते म्हणाले, “रवींद्र जडेजा हा सध्याचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो संघासोबत आहे आणि त्याला संघाची संस्कृती माहीत आहे. जडेजा कर्णधारपद सांभाळण्यास सक्षम आहे. धोनी संघात राहिल्याने जडेजाकडे नेहमीच मार्गदर्शक शक्ती असेल. मला वाटते की हे एक चांगले संयोजन असेल.”
धोनीने 204 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने 121 सामने जिंकले आणि 82 सामने गमावले आहेत. याशिवाय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. CSK आयपीएल 2022 चा पहिला सामना KKR विरुद्ध खेळणार आहे, जो 26 मार्च रोजी खेळला जाईल.