मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. शार्दुल रोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ टाकून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. दरम्यान, शार्दुल ठाकूरने इंस्टाग्रामवर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, ‘मला वाटतं की प्रसिद्ध होण्यासाठी बॉडीगार्ड असणे हा अत्यंत आवश्यक भाग आहे’. शार्दुल ठाकूरच्या या पोस्टवर टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने भन्नाट कमेंट केली आहे. युझवेंद्र चहलने अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माच्या शरीराची खिल्ली उडवली आहे.
युझवेंद्र चहलने लिहिले की, “बॉडीगार्डची बॉडी कुठे ठाकूर साहेब.’ या कमेंटसोबतच चहलने हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे. मात्र, या कमेंटनंतर युझवेंद्र चहल स्वतः ट्रोल झाला. चहलला ट्रोल करत एका यूजरने लिहिले की, “एवढ्यात तर 10 युजवेंद्र चहल येतील भाऊ.’ आणखी एका यूजरने लिहिले की, “बघा कोण बॉडीबद्दल बोलत आहे.”
चहल सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही चहल सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाला आहे. दुसरीकडे, शार्दुल ठाकूरबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला शार्दुल या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.
शार्दुल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर युझवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स संघाचा भाग बनला आहे. युझवेंद्र चहल गेल्या मोसमात विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळताना दिसला होता. या हंगामात गुजरात आणि लखनौ हे दोन नवे संघ जोडले गेल्याने यावेळचे आयपीएल जबरदस्त असेल अशी अपेक्षा आहे.