नवी दिल्ली : आयपीएल 2022, 26 मार्चपासून सुरू होत असून 29मे रोजी अंतिम सामना होणार आहे. आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी, खेळाडूंना सतत दुखापत होणे आणि आंतरराष्ट्रीय संघांचे व्यस्त वेळापत्रक सर्व संघांसाठी तणाव वाढवत आहे. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात 26 परदेशी खेळाडू आहेत जे आपल्याला खेळताना दिसणार नाहीत. या सगळ्या दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स या नवीन IPL संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील 5 सुपरस्टार खेळाडू आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातून बाहेर होऊ शकतात.
केएल राहुल हा लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे आणि संघ प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. मेगा लिलावात संघाने बराच खर्च केला. या लिलावात संघाने एकापेक्षा एक खेळाडू विकत घेतले होते. पण आता संघाचा तणाव वाढला आहे कारण सुरुवातीच्या सामन्यांमधून, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, काइल मायर्स, मार्क वुड आणि क्विंटन डी कॉक हे दिग्गज खेळाडू बाहेर होऊ शकतात. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या सर्व खेळाडूंना 5 एप्रिलनंतरच आयपीएलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे मार्कस स्टॉइनिस संघासोबत उशीरा जोडला जाईल आणि जेसन होल्डर, काइल मायर्स आणि क्विंटन डी कॉक हे खेळाडू त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघांसह खेळत आहेत.
दरम्यान, अलीकडेच मार्क वुडला वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजी करताना उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे वुडने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात पुढे गोलंदाजीही केली नाही. मार्क वुडची ही दुखापत जोफ्रा आर्चरसारखी आहे. जोफ्रा आर्चरनेही अशाच दुखापतीची तक्रार केली होती, त्यानंतर त्याच्या हाताच्या कोपऱ्याचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर हा खेळाडू काही काळासाठी क्रिकेटपासून दूर आहे. मार्क वुड 145 कि.मी. तासाच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो, अशा स्थितीत लखनौसाठी हा मोठा धक्का असू शकतो.