मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील वाद अजूनही मिटलेला नाही. कंगणाने जावेद अख्तर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अख्तर यांनी कंगणावर मानहाणीचा गुन्हा दाखल केला होता. कंगनाविरोधात जावेद अख्तरांच्या सुरु असलेल्या केसवर ७ एप्रिल,२०२२ रोजी सुनावणी होणार होती. पण न्यायमूर्ती उपस्थित राहू न शकल्याने अचानक सुनावणी रद्द करण्यात आली. यामुळे अख्तर आता निराश झाले आहेत.

या विषयी जावेद अख्तर यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं की, “मी केससंदर्भातील प्रत्येक सुनावणीला स्वतः हजर राहण्याचा प्रयत्न करतो. जे सुरु केलंय ते संपवावं तर लागणारंच आहे”. असं म्हणत जावेद अख्तर यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.

जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल करीत नोव्हेंबर २०२० मध्ये कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा करीत तिनं एका टी.व्ही मुलाखतीत आपल्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचं म्हटलं होतं. तिच्या त्या वक्तव्यामुळे आपली सामाजिक प्रतिमा डागाळली जातेय असं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं.

दरम्यान, कंगनाची ही केस तेव्हा सुरू झाली जेव्हा सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली अन् त्यासाठी कंगना बॉलीवूडला जबाबदार धरत मुलाखती देत होती. त्यावळी तिनं जावेद अख्तर यांचंही नाव घेतलं होतं. सुशांत केसमध्ये जावेद यांना तिने क्रिमिनलच म्हटलं होतं. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता.