मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द दिल्ली फाइल्स’ नावाचा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना सोशल मीडियावर सांगितलं की, या चित्रपटाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ‘द दिल्ली फाइल्स’चे पोस्टर शेअर करत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं अभिनंदन करत लिहिले, “द दिल्ली फाइल्स’साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की, चित्रपट निर्माते म्हणून तुम्हीही या इतिहासाच्या चुकीच्या पद्धतीने समोर आणलेल्या पानाला न्याय द्याल. त्याचा एक भाग होण्यासाठी उत्सुक आहे.”

‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले, “ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला आपलं म्हणून स्वीकारलं त्या सर्वांचे मी आभार मानतो. गेली 4 वर्षे आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे आणि शिस्तीने मेहनत घेतली. कदाचित मी तुमची टाइमलाइन बदलत आहे, परंतु लोकांना काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार आणि हत्यांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. आता माझ्या नवीन चित्रपटावर काम सुरू करण्याची वेळ आली आहे.”