भारत (India) हा कृषीप्रधान देश मानला जातो. पण असे असतानाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते आणि पीक नष्ट करावे लागते. असाच काहीसा प्रकार तामिळनाडू (Tamil Nadu) तील तिरुपूर जिल्ह्यातील अल्लापुरममध्ये घडला.
येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने आपल्या चार एकर जमिनीत पिकवलेले टोमॅटो (Tomatoes) नष्ट केले आहेत. वास्तविक पाहता 41 वर्षीय शिवकुमार यांनी हंगामासाठी टोमॅटोची लागवड केली होती, परंतु त्यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही.
त्यांनी स्वतःच ट्रॅक्टरने आपली शेती पूर्णपणे उद्ध्वस्त केली. शिवकुमार (Sivakumar) यांनी पिकावर भरपूर खर्च केल्याचे सांगितले आणि तो खर्च निघाला नाही, त्यामुळे त्यांना पीक नष्ट करण्यास भाग पडले असे त्यांनी सांगितले.
शिवकुमार यांनी बियाणे पेरणे, तण काढणे, शेतात खत घालणे, फळे तोडण्यासाठी कामगारांना पैसे देणे आणि नंतर मालवाहू वाहनात टोमॅटो भरणे यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च केले आहेत. एवढा खर्च करून टोमॅटो केवळ पाच रुपये किलोने विकत घेतला जात आहे.
सरकारने हस्तक्षेप करून किमान 15 रुपये किलोने टोमॅटो खरेदी केल्यास शेतकरी (Farmers) वाचतील, असे शिवकुमार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, कोणताही शेतकरी स्वतःचे पीक कधीही खराब करू इच्छित नाही. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार पुढे येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्याचे कृषी मंत्री एमआरके पन्नीरसेल्वन (MRK Pannirselvan) यांनी तमिळनाडूमधील कृषी क्षेत्राच्या उन्नतीचे आश्वासन देणारा कृषी अर्थसंकल्प सादर केला त्याच दिवशी शिवकुमार यांनी त्यांचे पीक नष्ट केले.