मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल हे रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली काही दिवसांपूर्वी या कपलने दिली आहे. मात्र, आथियाचे वडील सुनील शेट्टी आणि राहुलमध्ये अनेक गोष्टींनमधून वाद होत असतात. याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत के एल राहुलने वक्तव्य केले आहे.

के एल राहुलने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखती दरम्यान, के एल राहुलने सुनील शेट्टी यांच्या क्रिकेट विषयीच्या मता विषयी सांगितले. तो म्हणाला, “सुनील शेट्टी हे क्रिकेटचे मोठे चाहते तर आहेत आणि त्यांना क्रिकेटची चांगली माहितीही आहे. पण कधी कधी आम्ही दोघे क्रिकेटवर चर्चा करतो त्यावेळी आमच्यात खूप वादही होतात”.

“त्यांना क्रिकेट विषयी माहिती असल्यामुळे ते नेहमीच बोलतात की तू फीट नाहीस, तू नीट जेवत नाही आणि म्हणून तुला दुखापत होते. त्यांचे हे बरोबर आहे. कारण त्यांची जीवनशैली आणि ट्रेनिंग हेल्दी आहे. जर ते वयाच्या ६० व्या वर्षी फीट राहू शकतात तर मी का नाही राहू शकतं अस मला वाटते”, असं राहुल म्हणाला.