जुन्नर : 2014 मध्ये जुन्नर तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळल्याची गंभीर दुर्घटना आपल्या सर्वांना माहीतच आहे. आता याच घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 29 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दरम्यान, नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या या दुर्घटनेत संपूर्ण गावच एका रात्रीत नाहीसं झालं होतं. यात खूप जीवित हानीही झाली होती. हीच हृदयस्पर्शी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन नव्यानं कथानक लिहिलं गेलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी केली आहे. तर रुपेश राणे, अरूण अरुण कोंजे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.