
मुंबई : अलीकडेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी चित्रपटाच्या समर्थनात आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी चित्रपटात अनेक गोष्टी काल्पनिक दाखवल्या असल्याचे म्हणत चित्रपटावर आक्षेप नोंदवत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले देखील पाहायला मिळाले. एकीकडे चित्रपटाचे कौतुक होत आहे. तर, दुसरीकडे अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे. यावरच ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी आपले परखड मत मांडले आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या सिम्बीऑनलाईन मोबाईल अॅपच्या लॉंचिंगवेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकरांना ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर काही प्रश्न विचारण्यात आले. यावर नाना पाटेकर म्हणाले की, “हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मला यावर जास्त बोलता येणार नाही. चित्रपट पहिला असता तर मी या चित्रपटावर आपले मत मांडू शकलो असतो. पण मला असं वाटतं की, इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच राहावं. गट होत असतील तर ते चुकीचं आहे”, असं देखील नाना पाटेकर यांनी म्हंटले आहे.
“मला वाटतं की ही तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाही. ही तेढ कुणी जाणूनबुजून निर्माण करत असेल, तर त्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारा. सगळे छान सलोख्यानं राहात असताना मध्येच कुठेतरी बिब्बा घालायचा याची काही गरज नाहीये. चित्रपट आहे तो तसाच पाहावा. त्यातली वस्तुस्थिती काहींना पटेल, काहींना पटणार नाही. त्यामुळे त्यावरून गट पडणं साहजिक आहे. पण म्हणून त्यावरून समाजात तेढ निर्माण होणं हे योग्य नाही”, अशा शब्दांत नाना पाटेकरांनी आपले परखड मत मांडले आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यामध्येअनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेवर आधारित आहे.