मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे चित्रपटाचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे अनेकजण चित्रपट विरोधात आक्षेप घेत आहेत. हा दोन गटातील वाद चालू असतानाच यात आता अभिनेत्री तापसी पन्नूची देखील भर पडली आहे. तिने नुकतेच या वादावर आपले मत मांडले आहे.

तापसी पन्नू चित्रपटाला होणाऱ्या वादावर म्हणाली, ‘मी नंबर्स पाहिले. कारण यामागचं काहीही असलं तरीही चित्रपटानं खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. जर असा एखादा लहान आणि कमी बजेट असलेला चित्रपट एवढी कमाई करू शकतो तर मग तो वाईट चित्रपट तर असू शकत नाही. तुम्ही लोकांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता. तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग तुम्ही त्यांच्या विचारांशी सहमत असाल किंवा असणार नाही.’ तापसीची ही प्रतिक्रिया सध्या बरीच चर्चेत आहे.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 79.25 कोटी रुपयांची कमाई केली. तर सातव्या दिवशी चित्रपटाने 19.05 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आता 200 कोटींची कमाई केली आहे.