मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या परखड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. दरम्यान, स्वराने नुकतंच चर्चेत असलेल्या ‘द काश्मिर फाइल्स’च्या चित्रपटाच्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला टोला लगावला आहे. विवेक यांनी बॉलिवूडमधील बडी नावं आणि कलाकार ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या पाठीशी उभे राहिले नाही, अशी खंत बोलून दाखवलीये. यावर स्वराने विवेक यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

अभिनेत्री स्वराने या चित्रपटाबद्दल आपल्याला पाठिंबा दिला जात नसल्याचं म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींना टोला लगावलाय. तुम्ही यापूर्वी लोकांशी कसे वागले आहात असं सूचित करत स्वराने विवेक यांना टोला लगावलाय. “कोणी तरी येऊन तुमच्या ‘यशासाठी’ तुमचं अभिनंदन करावं असं वाटत असेल तर आधीची पाच वर्षे तुम्ही त्यांच्या डोक्यावर घाण करता कामा नये,” असं स्वराने म्हटलंय. या ट्विटमध्ये स्वराने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र हा टोला विवेक अग्निहोत्रींना लागवल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या उजव्या विचारसणीसाठी ओळखले जातात. मागील काही काळापासून अनेकदा त्यांनी वेगवगेळ्या प्रकरणांमध्ये आपली रोकठोक मतं व्यक्त केली आहेत. या मतांवरुन त्यांनी काहींनी पाठिंबा दर्शवलेला तर काहींनी विरोध केलेला. या रोकठोक मतांमध्ये अग्निहोत्री यांनी अगदी चित्रपटांपासून ते सामाजिक आणि राजकीय विषयांवरही भाष्य केलंय. त्यामुळेच त्यांनी हे भाष्य करताना ज्यांना दुखावलंय ते आता त्याचं अभिनंदन कसं करतील, असं स्वराला या ट्विटमध्ये म्हणायचे आहे. स्वराच्या या ट्विटमुळे ती सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. रिट्विट करत अनेकांनी स्वराला ट्रोल केले आहे.

दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.