मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने एक नवीन वादाला तोंड फुटलेले दिसत आहे. चित्रपटावरुन जोरदार राजकारणही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री होण्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. यानंतर आता एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केले आहे.

चित्रपटावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ““काही लोकांनी एक मोहीम सुरू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला. त्यावर एक सिनेमा आला आहे. त्या सिनेमातून मन जोडण्याऐवजी मन विचलित कशी होतील, अंतर कस वाढेल, विद्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी करण्यात आली आहे. गांधींवर टीका टिप्पन्नी या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाते. ज्या वेळेला समाजामध्ये विद्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल तो चित्रपट बघितला पाहिजे, तो अतिशय चांगला आहे असे जर देशाचे पंतप्रधान म्हणण्याला लागले तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत,” असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.