मुंबई : अलीकडेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेकांनी चित्रपटाच्या समर्थनात आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी चित्रपटात अनेक गोष्टी काल्पनिक दाखवल्या असल्याचे म्हणत चित्रपटावर आक्षेप नोंदवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या दोन गटातील वादावर आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपटावर प्रतिक्रिया देताना नागराज मंजुळे म्हणाले, “एखादा चित्रपट प्रदर्शित झालाय. तो पाहा आणि मग त्यावर विचार करा. कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वाद सुरु आहे. या वादाला काहीही अर्थ नाही. तुमच्या जीवनात जर त्याचा काही परिणाम झाला तर चांगलचं आहे. दिग्दर्शक त्याच्या घरी असणार आहे. पण तुम्ही चित्रपटगृहाबाहेर अशी हाणामारी करणे योग्य नाही.”

“मी फक्त झुंडच बघणार असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचं देखील मला पटत नाही. तुम्ही सगळे चित्रपट पाहा. अगदी ‘पावनखिंड’ आणि ‘काश्मीर फाइल्स’ हे देखील चित्रपट बघा. माझ्यावरील प्रेमापोटी झुंड पाहा असं म्हणणाऱ्या लोकांचं देखील मला पटत नाही. माझी विनंती आहे असं काहीही करु नका. रागाने किंवा प्रेमापोटी झुंड चित्रपट पाहा असं अजिबात म्हणू नका”, असेही नागराज मंजुळेंनी यावेळी सांगितले.

दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर 79.25 कोटी रुपयांची कमाई केली. तर सातव्या दिवशी चित्रपटाने 19.05 कोटींची कमाई केली आहे. एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता 98.30 कोटी रुपये आहे. हा चित्रपट आज 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार आहे.