मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त ३ दिवस झाले आहेत पण चित्रपटाने संपूर्ण बजेट वसूल केले आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींचा टप्पा पार करेल. मात्र, या चित्रपटात दाखवलेली कथा पडद्यावर उतरवने एवढे सोपे नव्हते. यासाठी केलेल्या अखंड प्रयत्नावर दिग्दर्शक विवेक यांनी नुकतेच भाष्य केले आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या चित्रपटासंदर्भात आज दिल्लीत पहिली पत्रकार परिषद झाली. ही पत्रकार परिषद घेण्यामागचा मुख्य उद्देश हाच होता की विवेक अग्निहोत्री यांना चित्रपट बनवताना किती मेहनत घेतली गेली, कोणत्या बारकाव्याची काळजी घेतली गेली तसेच हा चित्रपट वस्तुस्थिती आणि वास्तवाच्या दृष्टीने किती अचूक आहे हे सांगायचे होते.

यावेळी विवेक सांगतात की, हा चित्रपट बनवण्यासाठी 5000 तासांचे संशोधन करण्यात आले, 15 हजार पानांची कागदपत्रे जमा करण्यात आली. सुमारे दीड तासाच्या पत्रकार परिषदेत विवेक अग्निहोत्री यांनी 20 मिनिटांचा व्हिडिओही दाखवला. या व्हिडीओमध्ये त्या काश्मिरी पंडितांची मुलाखत होती जे त्या काळात काश्मीरमध्ये वास्तव्यास होते.

पुढे मुलाखतीत विवेक सांगतात की, ते आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी यांनी खऱ्या पीडित काश्मिरी पंडितांना भेटण्यासाठी जगभरातील अनेक देश आणि भारतातील अनेक शहरांमध्ये प्रवास केला आणि 700 हून अधिक पीडित काश्मिरी पंडितांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्या. हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 4 वर्षांचा कालावधी लागला. असे विवेक अग्निहोत्री यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी, पुनीत इस्सार, अमन इक्बाल, दर्शन कुमार, भाषा सुंबळी आणि इतर अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.