Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

Thane Ring Metro Project : ठाणेकरांचा प्रवास होणार वेगवान ! लवकरच रिंग मेट्रोला मिळणार मंजुरी

केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या शिंदे यांनी पुरी यांचीही भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा केली.

0
Thane Ring Metro Project : ठाणेकरांचा प्रवास वेगवान होण्यासाठी रिंग मेट्रोला मंजुरी देणार असल्याची ग्वाही केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. वाढते शहरीकरण, नागरीकरण, त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पा’ला तातडीने मान्यता द्या आणि मेट्रो कोचची संख्याही वाढवा, अशी मागणी शिंदे यांनी केली होती.

 

केंद्रीय गृह मंत्रालयाने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या शिंदे यांनी पुरी यांचीही भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा केली.

वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबईसोबतच ठाणेकरांसाठी देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ‘ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प’ किती गरजेचा आहे हे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित होते. ठाणे शहरात सध्या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसेच शहर-जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे.

ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावर ७ ते ८ लाख प्रवाशांची वर्दळ आहे. त्यामुळे २९ किमी लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला असून त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी करतानाच भविष्याच्या दृष्टीने मेट्रो कोचची संख्या वाढवण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन पुरी यांनी शिंदे यांना दिले. ठाणे शहर गजबजलेले आहे. या रिंग मेट्रोमुळे लोकांना सहज प्रवास करणे, तसेच विना अडथळा आणि वेगवान प्रवास करणे शक्‍य होणार आहे.

असा आहे ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प
एकूण २९ किमी लांबीच्या या प्रकल्पात २६ किमी लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून ३ किमीचा मार्गहा भूमिगत आहे. प्रकल्पांतर्गत एकूण २२ स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातील एक भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. अन्य स्थानके शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.