नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात असे काही खेळाडू आहेत. जे पहिल्यापासून खेळताना दिसत आहेत. मात्र, यावेळी ते खेळणार नाहीत. यातील प्रमुख नाव म्हणजे सुरेश रैना, लिलावात या खेळाडूला विकत घेण्यात कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही. रैना लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह उतरला होता पण तो अनसोल्ड राहिला. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संतापही व्यक्त केला होता, आता त्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सुरेश रैना आयपीएलमध्ये पुन्हा दिसणार आहे. रैना रवी शास्त्रीसोबत आयपीएलच्या 15 व्या हंगामात समालोचक म्हणूनही पुनरागमन करत आहे.
सुरेश रैनाला लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने सोडले होते. पूर्ण आयपीएल प्रवासात सुरेश रैना आतापर्यंत फक्त चेन्नई आणि गुजरात लायन्सकडून खेळला होता. या दोघांशिवाय रैनाचा अन्य कोणत्याही संघाशी संबंध नव्हता. या मोसमात त्याने आपले नाव लिलावात 2 कोटी रुपये बेस प्राईससह दिले. मात्र, या लिलावात रैना अनसोल्ड राहिला. रैनाला कोणत्या फ्रँचायझीने संघात सामील न केल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग काढला.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रैना समालोचक म्हणून दिसणार आहे. सुरेश रैनाची आयपीएलमधील स्टार खेळाडूंमध्ये गणना होते. आता तो समालोचक म्हणून दुसऱ्या इनिंगची सुरुवात करणार आहे. त्याचवेळी, अहवालात असे म्हटले आहे की भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री देखील आयपीएल कॉमेंट्रीमध्ये पुनरागमन करत आहेत, परंतु यावेळी त्यांची शैली वेगळी असेल. रवी शास्त्री यावेळी इंग्रजीत नाही तर हिंदीमध्ये समालोचन करणार आहेत आणि त्यासाठी ते खास क्लासही घेत आहेत.
IPL 2022 यंदा 26 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना KKR आणि CSK यांच्यात होणार आहे, तर ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना 22 मे रोजी होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे.