हैदराबाद : कन्नड दिगवंत सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचा आज ( 17 मार्च ) वाढदिवस आहे. आजच्या दिवशी पुनीत यांचे चाहते त्यांच्या घराच्या बाहेर धुमधडाक्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत होते. मात्र यावर्षी हा लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता आपल्यात नाही. मागच्या वर्षी 2021 मध्ये त्यांचे अचानक निधन झाले, हा दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का होता. त्याचवेळी, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुपरस्टार यश याने पुनीत यांच्या आठवणीना उजाळा दिला आहे.

अभिनेता यशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा आणि पुनित राजकुमारचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. ‘एक स्मित जे कधीही मिटत नाही, एक उबदारपणा जो कधीही जुळत नाही, एक ऊर्जा जी कधीही थांबविली जाऊ शकत नाही, एक शक्ती जी कधीही हिरावून घेतली जाऊ शकत नाही. तो जिंकला आहे. अप्पू सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’ असे सुंदर कॅप्शन या पोस्टला दिले आहे. यशाच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत पुनित यांची आठवण काढत आहेत.

दरम्यान, पुनीत यांना २९ ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1 ते 1:30 च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेल्यामुळे पुनीत यांचे निधन झाले. वयाच्या 46व्या वर्षी पुनीत यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने जगभरातून दुःख व्यक्त केले जात होते. लाखो लोकांच्या मनात घर करून गेलेला हा अभिनेता आपल्यात कायम जिवंत राहणार आहे.