मुंबई : सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या ‘राधे श्याम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात प्रभासने ज्योतिषाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रभास त्याच्या चित्रपटाचे प्रमोशनही करत आहे. अलीकडेच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभासने बॉलिवूड क्वीन कंगना राणौतशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे.

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभासने सांगितले आहे की, एका ज्योतिषाने कंगना राणौतबद्दल काही वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. जी आजच्या काळात खरी ठरली आहे. हे खुद्द कंगनाने प्रभासला सांगितले होते. प्रभासने सांगितले की, “जेव्हा आम्ही ‘एक निरंजन’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो तेव्हा कंगनाने मला एक मजेशीर गोष्ट सांगितली. कंगना एका छोट्या गावात वाढली ज्याचा सिनेमाशी काहीही संबंध नाही. मग ती एका मैत्रिणीसोबत केरळला गेली, तिथे तिची भेट एका ज्योतिषाशी झाली.”

“ज्योतिषाने कंगनाला भेटल्यानंतर ती अभिनेत्री होणार असल्याचे सांगितले होते. ज्योतिषाचे हे ऐकून कंगना हसायला लागली आणि तिने या गोष्टीची खिल्ली उडवली कारण ती एका छोट्या शहरातील मुलगी आहे. मी हे म्हणत आहे कारण अशा अनेक गोष्टी घडल्या असतील आणि आपण त्या ऐकल्याही असतील. पण माझा या गोष्टींवर विश्वास नाही.” असं प्रभास यावेळी म्हणाला.