मुंबई : ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट घेऊन येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या चित्रपटात शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे.

‘शेर शिवराज’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. तसेच, या चित्रपटात अफजल खानाची भूमिका कोण साकरणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी याचा खुलासा करण्यात आला आहे. अफजल खानाच्या भूमिकेत बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मुकेश ऋषी दिसणार आहेत.

‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा याची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये अभिनेते मुकेश ऋषी यांनी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर कौतुक केलं.

मुकेश ऋषी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभी राहणारी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मला मिळालं याचा मला आनंद आहे. विशेष म्हणजे ज्याच्या ध्यासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अशा कल्पक आणि अभ्यासू दिग्दर्शकासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.”