मुंबई : सुप्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘RRR’ चित्रपट 25 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 248 कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत आता हिंदी बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 20 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. यानंतर दुसऱ्या दिवशीच्या आकडेवारीनेही प्रेक्षकांची झोप उडवली आहे.

प्रसिद्ध व्यापार तज्ञ तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाचे हिंदी बॉक्स ऑफिसचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदी बॉक्समध्ये 20.07 कोटींचे जबरदस्त कलेक्शन केले होते. तर दुसरीकडे या चित्रपटाने शनिवारी 23.75 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत 43.82 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, पहिल्या वीकेंडच्या अखेरीस चित्रपट 70 कोटींची कमाई करेल.

दरम्यान, एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात साऊथचे सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्याशिवाय बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. एवढेच नाही तर हा चित्रपट देशातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. या चित्रपटाने ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्डही मोडला आहे.