मुंबई : गायक मिका सिंग याचा एक रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ असं या शोचं नाव असून याच शोच्या प्रमोशनसाठी मिकाने नुकतेच दिल्लीत पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते. मात्र या पत्रकार परिषदेत त्याने एका वरिष्ठ पत्रकाराला चक्क शिवीगाळ केली आहे.

मिका सिंग आणि अभिनेत्री राखी सावंत यांच्यातील वाद तर सर्वांनाच माहीत आहे. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर एका पत्रकाराने मिकाला राखी सावंतबद्दल प्रश्न विचारला. यामुळे यावेळी मिका संतापलेला पाहायला मिळाला. यावेळी पत्रकाराने ‘स्वयंवर शोमध्ये राखीसुद्धा भाग घेणार आहे का? असा प्रश्न मिकाला विचारला असता मिकाला राग अनावर झाला. माध्यमांसमोर काहीच उत्तर न देता तो तिथून निघून गेला. त्यानंतर राखीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला आणि शोच्या संपूर्ण टीमला एका रुममध्ये बोलावून मिकाने वाद घातला. मिकाने पत्रकाराला शिवीगाळसुद्धा केली.

घडलेल्या प्रकारानंतर शोच्या टीमने पत्रकारांची माफी मागितली आणि रुममध्ये जे काही घडलं त्याबद्दल कोणाला काहीच कळू नये, याची विनंती केली. 2006 मध्ये मिका आणि राखीमधील वाद चांगलाच गाजला होता. माध्यमांसमोर मिकाने राखीला किस करताच तिने त्याच्या कानाखाली मारली होती.