Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

धनतेरसच्या मुहूर्तावर आज महाराष्ट्रात सोयाबीनला काय भाव मिळाला ? दिवाळीनंतर दरात आणखी वाढ होणार का?

0

Soyabean Bajarbhav : आज धनत्रयोदशी अर्थातच धनतेरसचा सण आहे. कालपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. परवा लक्ष्मीपूजन तसेच दिवाळी साजरी केली जाणार आहे. यामुळे संपूर्ण देशभरात मोठे उत्साहाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा मात्र दिवाळीच्या सणातही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग आहेत.

याचे मुख्य कारण म्हणजे दुष्काळ. यंदा मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला आहे. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती तयार झाली आहे. महाराष्ट्रात यावर्षी सरासरीच्या तुलनेत तब्बल 12% कमी पावसाची नोंद झाली आहे.

काही ठिकाणी अक्षरशः पेरणी देखील झालेली नाही. ज्या भागात थोडाफार प्रमाणात पाऊस बरसला तेथील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने सोयाबीन, कापूस, मका यांसारख्या पिकांची पेरणी केली होती. मात्र पिकांमधून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाहीये.

सोयाबीनचा विचार केला तर शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा मिळत आहे. काही शेतकऱ्यांना तर एवढाही उतारा मिळालेला नाही. आता उत्पादनात घट झालीये म्हटल्यावर दरात वाढ होईल अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना होती. पण ही आशा देखील आता फोल ठरू लागली आहे.

कारण की सोयाबीनचे बाजारभाव अजूनही दबावातच आहेत. खरतर गेल्या एका वर्षापासून सोयाबीनचे भाव मंदीत आहेत. नवीन हंगामात दरात वाढ होईल अशी आशा होती मात्र आता नवीन हंगाम सुरू होऊन जवळपास एका महिन्यांचा काळ उलटत चालला आहे परंतु दरात अपेक्षित अशी वाढ झालेली नाहीये.

दरम्यान सणासुदीच्या काळात सोयाबीनला चांगला दर मिळत नसतानाही नाईलाजाने शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागत आहे. आता आपण धनतेरसच्या दिवशी राज्यातील कोणत्या बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च दर

मंगळूरपीर कृषी उत्पन्न बाजार समिती : महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळूरपीरच्या मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे.

या मार्केटमध्ये आज 1317 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली होती. आज या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4600 रुपये प्रति क्विंटल कमाल 5170 प्रतिक्विंटल आणि सरासरी पाच हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे.

अर्थातच अजूनही सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विकला जात आहे. सरासरी बाजार भाव पाच हजार रुपयाच्या आसपास स्थिरावले आहेत. शेतकऱ्यांची सोयाबीनला सरासरी सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा आहे.

शेतकऱ्यांच्या मते, या कवडीमोल दरात जर सोयाबीन विक्री केली तर त्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येणार नाही. यामुळे दरात वाढ होणे जरुरीचे आहे नाहीतर त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.