Shivsena Symbol : (Shivsena Symbol) एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. शिवसेना नक्की कोणाची यावर वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले गेले. आता या दोन्ही गटांनी आपली नवीन नावे आणि चिन्ह सादर केली आहेत.

ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देण्यात आलं आहे तर पक्षाचे चिन्ह हे मशाल देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला (Eknath Shinde) बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं दिसून आलं.

दरम्यान, शिंदे गटाने दिलेल्या तीन चिन्हांपैकी कोणतही चिन्ह त्यांना मिळालं नाही. यामुळे आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे. यावर आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार – एकनाथ शिंदे

दरम्यान, काल निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्वीट करत “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत” अशी भावना व्यक्त केली आहे.