मुंबई : सलामीवीर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने आयपीएल (IPL 2022) च्या 15 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांनी पराभव केला. चालू मोसमाच्या सुरुवातीला चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले, जे लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. या सामन्यासह पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा युवा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा खूप प्रभावित केले. त्याने 4 षटकात केवळ 21 धावा देत 2 बळी घेतले.
रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु लियाम लिव्हिंगस्टोनच्या शानदार अर्धशतकामुळे पंजाबने 8 बाद 180 धावा केल्या. यानंतर चेन्नईचा संघ 18 षटकांत सर्वबाद 126 धावांवर आटोपला. चेन्नईकडून अष्टपैलू शिवम दुबेने सर्वाधिक 57 धावा केल्या. पंजाबचा फिरकी गोलंदाज राहुल चहरने 3 तर सामनावीर लिव्हिंगस्टोन आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालने चेन्नईसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले. हरप्रीत बरारच्या जागी युवा वेगवान गोलंदाज वैभव अरोराला संधी देण्यात आली तर राज बावाच्या जागी यष्टिरक्षक जितेश शर्माचा समावेश करण्यात आला. हिमाचलकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या वैभव अरोराने त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आणि रॉबिन उथप्पाची विकेट घेतली. यानंतर मोईन अली बोल्ड झाला.
24 वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा आतापर्यंत 13 टी-20 सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने 23 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या आहेत तर इकॉनॉमी रेट 6.82 आहे. 16 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. वैभव अरोरा गेल्या मोसमात केकेआरचा भाग होता, पण तो एकही सामना खेळू शकला नाही.
डावाच्या तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वैभव अरोराने उथप्पाला मयांक अग्रवालच्या हाती झेलबाद केले. यानंतर, त्याच्या पुढच्या म्हणजेच 5व्या षटकात मोईन अली बोल्ड झाला.
वैभवने विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत हॅटट्रिक घेतली आहे. त्याने आतापर्यंत 5 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत आणि 9 सामन्यांमध्ये 30 बळी घेतले आहेत. हिमाचल प्रदेशकडून खेळणाऱ्या वैभवला पंजाब किंग्जने मेगा लिलावात २ कोटी रुपयांना विकत घेतले.
पंजाबचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने वैभवचे कौतुक केले आहे. म्हणाला, “हा विजय अप्रतिम आहे, आम्ही सर्वोत्तम मार्गाने पुनरागमन केले आहे. वैभव अरोराने शानदार गोलंदाजी केली. तो आम्हाला नेटमध्येही त्रास देत होता. त्यामुळेच त्याला पदार्पणाची संधी मिळाली. तो चांगली लाईन-लेन्थ गोलंदाजी करतो.