मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आतापर्यंत अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होता. आता शाहरूख त्याची नवीन वाटचाल सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. तो लवकरच OTT प्लॅटफॉर्मच्या जगात आपला व्यवसाय वाढवणार आहे. याबद्दल स्वतः शाहरुखने सोशल मीडियावर घोषणा केली आहे.

शाहरुखने सोशल मीडियावर त्याच्या OTT पदर्पणाची घोषणा केली आहे. तो स्वतः SRK+ या नावाने त्याचा ओटीटी प्लॅटफॉर्म बनवणार आहे. शाहरुखने त्याच्या फोटोसह आणि नवीन प्लॅटफॉर्मच्या लोगोसह पोस्टला ‘कुछ कुछ होता है ओटीटी की दुनिया में’ असे कॅप्शन लिहिले आहे.

दरम्यान, शाहरुख खानने यापूर्वीच मनोरंजनाच्या व्यवसायात हात मारला आहे. त्यांच्या रेड चिलीज कंपनीने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. या बॅनरखाली त्याने केवळ स्वतःचेच नाही तर इतर कलाकारांचेही चित्रपट बनवले आहेत. ही कंपनी ग्राफिक्स सामग्री देखील प्रदान करते. आता शाहरुख डिजीटल जगात प्रवेश करून चांगलाच गोंधळ घालणार आहे. अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मला शाहरुख टक्कर देणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.