मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. रीमीची एका व्यक्तीने तब्बल 4.14 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात रीमीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भादंवि कलम ४२० आणि ४०९ अन्वये गुन्हा अंतर्गत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

रीमीने लेखी तक्रार करत म्हंटले आहे की, ‘तीन वर्षांपूर्वी अंधेरीतील एका जिममध्ये माझी गोरेगाव येथील रहिवासी रौनक जतीनशी भेट झाली. काही दिवसांनी आम्ही दोघे मित्र झालो. जतीनने सांगितले की, तो एक व्यावसायिक असून त्याने एलईडी लाईटची नवीन कंपनी उघडली आहे. त्यानंतर त्यांनी मला कंपनीत 40 टक्के परताव्यात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला. जेव्हा मी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी एक करार केला.’

‘गुंतवणुकीची मुदत संपल्यावर मी जतीनला माझा नफा मागितला, पण जतीनने माझे फोन घेणे बंद केले. चौकशीअंती जतीन यांनी अशी कोणतीही कंपनी सुरू केली नसल्याचे आढळून आले. त्यानंतर माझी फसवणूक झाल्याचे मला समजले आणि मी जतीनविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.’ अस रिमीने सांगितले.

दरम्यान, रिमी सेनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती एक अभिनेत्री-निर्माता आहे. तिने ‘हंगामा’, ‘बागबान’, ‘धूम’, ‘गरम मसाला’, ‘क्यूं की’, ‘फिर हेरा फेरी’ आणि ‘गोलमाल’ यांसारख्या हिंदी, तेलगू आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे.