मुंबई : दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाका करत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. विशेष म्हणजे RRR हा चित्रपट लवकरच १००० कोटींचा गल्ला जमवेल अशी आशा निर्माते आणि दिग्दर्शकांना आहे. त्यामुळे सर्वांचेच डोळे त्याकडे लागले आहे.

RRR या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच अनेक चाहत्यांना ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे या चित्रपटाने आतापर्यंत १२ दिवसात तेलुगू भाषेत ३५३ कोटींची कमाई केली आहे. तर तामिळमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यापाठोपाठ कन्नड भाषेत ७५ कोटींचा कमाई या चित्रपटाने केली आहे.

RRR चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये ७०० कोटी रुपयांचा गल्ला जमवेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले होते. तसेच हा चित्रपट ‘बाहुबली २’चा ८०० कोटींचा रेकॉर्ड मोडू शकणार नाही, असेही तज्ञांचे म्हणणे होते. मात्र या चित्रपटाने आतापर्यंत हे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. या चित्रपटाने जगभरात पहिल्याच आठवड्यात ७०९.३६ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे आतापर्यंत १२ दिवसात या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ९३९.४१ कोटींची कमाई केली आहे.