मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) नवा कर्णधार रवींद्र जडेजा महेंद्रसिंग धोनीचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना जडेजा म्हणाला की, माही भाई एकत्र असल्याने मला काळजी करण्याची गरज नाही.
चेन्नई सुपर किंग्सने ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये जडेजा म्हणाला, “माही भाईने आधीच एक मोठा वारसा प्रस्थापित केला आहे जो मला पुढे चालवायचा आहे. जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण माही भाई इथे आहे. मला काही प्रश्न असतील तर मी त्याच्याकडे जाऊ शकतो. तो माझा आवडता खेळाडू होता आणि अजूनही आहे. त्यामुळे काळजी करू नका आणि तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
गुरुवारी महेंद्रसिंग धोनीने जडेजाची सीएसकेच्या कर्णधारपदी निवड केली. यानंतर सर्वत्र प्रतिक्रिया उमटल्या. कर्णधार झाल्यानंतर जडेजाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, जडेजासमोर मोठे आव्हान असेल. धोनीसोबत राहिल्याने त्याला खूप काही शिकायला मिळेल आणि गरज पडल्यास तो धोनीकडून सल्लाही घेऊ शकेल.
📹 First reactions from the Man himself!#ThalaivanIrukindran 🦁💛 @imjadeja pic.twitter.com/OqPVIN3utS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022
महेंद्रसिंग धोनी हा एक दशकाहून अधिक काळ चेन्नई संघाचा कर्णधार आहे. अशा स्थितीत त्याच्या जाण्याने चाहत्यांची नक्कीच निराशा होईल, पण तो एक खेळाडू म्हणून संघात खेळताना दिसेल. धोनीला आता मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याची फलंदाजी पाहण्याचा आनंदही चाहत्यांना घेता येईल.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. 26 मार्च रोजी चेन्नई आणि केकेआर यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे.