मुंबई : माजी दिग्गज सलामीवीर सुनील गावस्कर यांनी IPL 2022 मधील पंजाब किंग्ज फ्रँचायझीबाबत मोठे विधान केले आहे. पंजाब किंग्जचा संघ यंदाच्या हंगामातही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकणार नाही, असे गावस्कर यांनी म्हटले आहे. सुनील गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, संघात कोणताही प्रभावशाली खेळाडू नाही आणि त्यामुळेच यंदाही विजेतेपद पटकावण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे.
मयंक अग्रवालकडे प्रथमच पंजाब किंग्जची कमान सोपवण्यात आली आहे. संघ 27 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध संध्याकाळी 7:30 वाजता पहिला सामना खेळेल. आयपीएल 2022 च्या लिलावात पंजाब किंग्जने इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोनला 11.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. याशिवाय त्यांनी शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो सारखे उत्कृष्ट सलामीवीरही घेतले आहेत. इतकेच नाही तर फ्रँचायझीने कागिसो रबाडा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ आणि राहुल चहर, राज अंगद बावा यांनाही खरेदी केले आहे.
मात्र, असे असूनही पंजाब किंग्जला आयपीएलचे जेतेपद पटकावता येणार नाही, असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला. एका संभाषणादरम्यान ते म्हणाले, “पंजाब किंग्स हा अशा संघांपैकी एक आहे ज्यांनी अद्याप विजेतेपद जिंकलेले नाही. यावेळी त्याच्या संघात कोणताही प्रभावशाली खेळाडू आहे असे मला वाटत नाही. मात्र, त्याचा त्यांना फायदाही होऊ शकतो. कारण जेव्हा जेव्हा संघाकडून अपेक्षा कमी असतात तेव्हा त्यांच्यावरील दबाव कमी होतो. जेव्हा दबाव कमी असतो तेव्हा खेळाडू अधिक मुक्तपणे खेळतात. त्यानुसार पंजाब किंग्ज काही सामन्यांमध्ये सरप्राईज देऊ शकतात असे मला वाटते. पण तो ट्रॉफी जिंकेल का, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हा टी-20 फॉरमॅट आहे आणि तुम्हाला सतत स्पर्धा करावी लागेल.”