Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गडकरींचा मेगाप्लॅन, देशातील पहिली हवेत उडणारी बस पुण्यात चालवणार, केव्हा धावणार ? वाचा….

0

Pune News : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा म्हणून पुणे शहरात मेट्रो सुरू करण्यावर भर दिला जात आहे. सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रो सुरु झाल्यापासून वाहतूक कोंडीतून थोडाफार दिलासा नागरिकांना मिळाला आहे.

पुणेकरांनी मेट्रोला चांगला प्रतिसाद देखील दाखवला आहे. यासोबतच पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी पुण्यातील लोकलचा विस्तार करण्याचा विचार शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे. सध्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल ट्रेन सुरू आहे. मात्र भविष्यात पुणे ते दौंड दरम्यान लोकल सेवा सुरू केली जाणार आहे.

पुणे ते दौंड हा रेल्वे मार्ग उपनगरीय करण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून रेल्वे बोर्डाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर या मार्गावर प्रत्यक्षात लोकल सुरू होणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते दौंड दरम्यान लवकरच लोकल सेवा सुरू होऊ शकते.

यामुळे पुणे ते दौंड हा प्रवास आणखी गतिमान होईल यात शंकाच नाही. विशेष म्हणजे या मार्गावर जर लोकल सुरू झाली तर पुणेकरांना कमी तिकीट दरात प्रवास करता येणार आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरात लवकरच हवेत उडणारी बस सुरू होणार आहे.

यामुळे शहरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे नाहीशी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी विदेश दौऱ्यावर असतांना स्कायबस तंत्रज्ञानाची पाहणी केली होती. तसेच हे तंत्रज्ञान देशातील प्रमुख शहरांमध्ये आणून वाहतूक कोंडी वर लगाम घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले होते.

अशातच स्काय बस तंत्रज्ञान हे देशात सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यात सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यासोबतच देशातील महत्त्वाच्या अशा पाच शहरांमध्ये स्कायबस तंत्रज्ञान सुरू करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे हे तंत्रज्ञान येत्या दोन वर्षात देशात सुरू होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. तसेच यासाठी स्वतः नितीन गडकरी पुढाकार घेणार असल्याचे कळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कायबस तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेली चाचणी गोवा राज्यातील मडगाव येथे पार पाडली जाणार आहे. दरम्यान, स्कायबस तंत्रज्ञान हे मेट्रो पेक्षा 50% स्वस्त पडणार आहे. या हवेत उडणाऱ्या बसेस 100 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम राहणार आहेत.

यामुळे हे तंत्रज्ञान देशात सुरू झाल्यास वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे. यामुळे आता हे तंत्रज्ञान येत्या दोन वर्षात पूर्ण होते का आणि देशातील हवेत उडणारी पहिली बस आपल्या पुण्यात सुरू होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.