मुंबई : बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपले नाव गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळे फोटो, व्हिडिओ शेअर करत ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, नुकतंच प्रियांकाने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने तिच्या आजीच्या वाढदिवसानिमित्ताने हे फोटो शेअर केले आहे.

प्रियांकाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या बालपणीचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने जांभळ्या रंगाचा टॉप आणि लाल रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. यातील एका फोटोत ती, तिची आई मधू चोप्रा आणि बहिण प्रियम माथूर तिच्या आजीसोबत गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत प्रियांका ही तिच्या आजीला केक भरवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रियांकाने हे फोटो पोस्ट करत त्याला खूपच भावूक कॅप्शन दिले आहे. त्यात तिने लिहिले की, “आज आम्ही सर्वजण माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करत आहोत. माझ्या संगोपनात आणि जडघडणीत तिचा फार मोठा वाटा आहे. जेव्हा माझे आई आणि वडील वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत होते, त्यांचे करिअर करत होते. त्यावेळी माझ्या आजीनेच मला वाढवलं. आमच्या कुटुंबाची काळजी घेतली. आजी मी तुझी फार आभारी आहे. तुझी नेहमीच मला आठवण येते”, असे प्रियांकाने या पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रियांकाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.