हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार यश याच्या आगामी KGF Chapter-2 चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजे चित्रपटातील ‘तुफान’ हे पहिले गाणे लवकरच रिलीज होण्याची तारीख समोर आली आहे. येत्या 21 मार्च रोजी सकाळी 11:07 वाजता हे रिलीज होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी एक पोस्टर रिलीज करत गाण्यासंदर्भात माहिती दिली आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘तयार व्हा! #तुफान येत आहे. 21 मार्च रोजी सकाळी 11:07 वाजता गाणं रिलीज होणार आहे. #KGFCchapter2 #KGF2onApr14.’ प्रशांत यांच्या या पोस्टवर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दल असलेलं आपले प्रेम दाखवत अनेक कमेंट केल्या आहेत.

‘KGF Chapter 2’ हा 2018मध्ये आलेल्या ‘KGF’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. मागच्या चित्रपटात यशच्या रॉकी भाई या पात्राची थेट गरुडाशी लढाई दाखवण्यात आली होती. आता नव्या चित्रपटात तो अधीराशी स्पर्धा करणार आहे, जी खूपच धोकादायक आहे. चित्रपटात संजय दत्त अधीराची भूमिका साकारत आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज हे कलाकार देखील झळकणार आहेत.