महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम यांची आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत.

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे नेते, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात भेट झाली आहे.

या भेटीत जलील यांनीच राष्ट्रवादीसोबत एमआयएम पक्ष आघाडी करायला तयार असल्याची ऑफर दिली आहे. खुद्द जलील यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

राष्ट्रवादीकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही. काही दिवसांपूर्वी मंत्री टोपे यांनी जलील यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा झाली.

‘प्रत्येकवेळी टीका करताना आमच्या पक्षाला भाजपची बी टीम असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तसे नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायलाही तयार आहोत,’ असे टोपे यांना आपण सांगितल्याचे जलील यांनी म्हटले आहे.

एवढेच नव्हे, तर अशीच ऑफर जलील यांनी काँग्रेसलाही दिली आहे. ते म्हणाले, मुस्लीमांची मते सर्वांनाच हवी आहेत. मात्र एमआयएमशी युती करण्यास कोणालाही नको आहे.

भाजपचा पराभव करण्यासाठी जे जे करावे लागेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यामुळेच ही भूमिका घेतल्याचे खासदार जलील यांनी स्पष्ट केले आहे.