मुंबई : नुकतेच ऑस्करच्या 94व्या अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा सध्या चांगलाच गाजला आहे. त्याचे कारण म्हणजे या सोहळ्याचे निवेदन करणारा कॉमेडियन ख्रिस रॉक याला अभिनेता विल स्मिथने मंचावर जाऊन कानशिलात मारल्यामुळे. या घडलेल्या घटनेवर गेली तीन दिवस झाले अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान या सर्व घटनेवर विल स्मिथ आणि त्याच्या पत्नीनेही प्रतिक्रिया दिली होती. पण आतापर्यंत मौन बाळगलेल्या ख्रिस रॉकनेही अखेर यावर भाष्य केलं आहे.
काल रात्री ख्रिस रॉक बोस्टनमधील एका स्टँडअप शोसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने मंचावर प्रवेश करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं. यानंतर काही वेळाने त्याने उपस्थितांशी संवाद साधला आणि ऑस्करच्या मंचावर विल स्मिथने लगावलेल्या कानाखालीचा उल्लेख केला. ख्रिसने प्रेक्षकांना सांगितलं की, “जे काही झालं त्याबद्दल भाष्य करण्यासाठी माझ्याकडे जास्त काही नाही, त्यामुळे जर तुम्ही त्याबद्दल ऐकण्यासाठी आला असाल तर माझ्याकडे एक पूर्ण शो आहे जो मी या विकेंडच्या आधी लिहिला आहे. जे काही घडलं ते मी अजूनही पचवत आहे. एखाद्या क्षणी जेव्हा वेळ येईल तेव्हा मी याबद्दल बोलेन आणि ते गंभीर तसंच मजेदार असेल”. असं ख्रिस म्हणाला.
दरम्यान, ऑस्कर सोहळ्यात ख्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. येताच त्याने एक विनोद केला. ख्रिसने यावेळी विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. यामुळे चिडलेल्या विल स्मिथने थेट स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकच्या कानाखाली मारली. काही वेळासाठी सर्वांना हा स्टंट वाटला, मात्र नंतर हे खरोरखच घडलं असल्याचं लक्षात आलं आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले.