मुंबई : नुकतेच ऑस्करच्या 94व्या अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा सध्या चांगलाच गाजला आहे. त्याचे कारण म्हणजे या सोहळ्याचे निवेदन करणारा कॉमेडियन ख्रिस रॉक याला अभिनेता विल स्मिथने मंचावर जाऊन कानशिलात मारल्यामुळे. या घडलेल्या घटनेवर गेली दोन दिवस झाले अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने एक पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.

विल स्मिथने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. यावर विल स्मिथ म्हणाला, “कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझ्या खर्चाची खिल्ली उडवणे हा माझ्या कामाचा भाग आहे. पण पत्नी जाडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले.”

“क्रिस, या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचीही जाहीर माफी मागू इच्छितो. मला विल्यम्स कुटुंबाची आणि माझ्या राजा रिचर्ड कुटुंबाचीही माफी मागायची आहे. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग पडला आहे, याचे मला मनापासून खेद वाटतो. मी त्यावर काम करत आहे आणि करेन”, असे विल स्मिथ म्हणाला. विल स्मिथने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

View this post on Instagram

A post shared by Will Smith (@willsmith)

दरम्यान, काल सोहळ्यात विल स्मिथला यावर्षी ‘किंग रिचर्ड’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यावेळी क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. त्यावेळी त्याने विल स्मिथच्या पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर विल स्मिथ हे आवडले नसल्याने स्टेजवर जाऊन त्याने त्याला कानाखाली मारल्याचं दिसून आलं. मात्र, यामुळे विलला त्याचा पुरस्कार परत द्यावा लागतो की काय अश्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.