मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून एक अनमोल प्रेम कहाणी सांगणाऱ्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील चंद्रा आणि दौलतराव यांच्यावर आधारित चित्रपटातील एक गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं सध्या ट्रेंडिंगला आले असून अनेकांनी यावर पसंती दर्शवली आहे.

‘तो चांद राती’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याला गुरु ठाकूर यांनी शब्द दिले असून, अजय अतुल यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तसेच, हे गाणं सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने गायलं आहे. हे गाणं एक रोमँटिक सॉंग असून यातील चंद्राच्या अदांनी सर्वांना घायाळच केलं आहे. या गाण्यात चंद्रा आणि दौलतराव यांची फुलती प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीवर आधारित हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात चंद्राची भूमिका अभिनेत्री अमृता खानवेलकर तर दौलतरावची भूमिका अभिनेता आदिनाथ कोठारे करत आहे.