मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात राज्य करणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी आज यशाच्या उंच शिखरावर पोहचला आहे. तो त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या परखड व्यक्ती महत्वासाठीही ओळखला जातो. दरम्यान, नवाजुद्दीनने नुकतंच बॉलीवूडमधील वर्णभेदावर, नेपोटिझमवर भाष्य केले होते.

एका मुलाखतीच्या माध्यमातून नवाझुद्दीननं बॉलीवूडमधील सत्य प्रेक्षकांसमोर आणलं आहे. बॉलीवूडमध्ये वर्णभेद आहे का असा प्रश्न मुलाखत कर्त्यानं नवाझुद्दीनला विचारला. त्यावर तो म्हणाला, “हो आहे तर, मला बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचारप्रवाह दिसून येतात. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वर्णभेद आणि वर्चस्ववाद. या दोन्ही गोष्टी बॉलीवूडमध्ये आहे.”

“नेहमी या दोन गोष्टींची चर्चा होत असते. मी त्यावर असं म्हणेन की, मला बॉलीवूडमध्ये एक काळ्या रंगाची अभिनेत्री दाखवा, आहे का आपल्याकडे उत्तर…. दरवेळी गोऱ्या रंगाच्या अभिनेत्री आपल्या समोर येतात. मग ज्या काळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात येते. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही होतो. हे आपण लक्षात घ्यायला तयार नाही. बॉलीवूडमध्ये घराणेशाही आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याठिकाणी मी माझ्या संघर्षांच्या जोरावर स्वताचे स्थान निर्माण केले आहे. आणि मी स्टार अभिनेत्यांइतकेच मानधन घेतो. कारण मी स्वताला सिद्ध केलं आहे”. अशीही प्रतिक्रिया नवाझुद्दीननं यावेळी दिली.