मुंबई : अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते कायम कोणत्या ना कोणत्या कविता पोस्ट करत असतात. त्यांनी लिहिलेले अनेक ब्लॉग चाहत्यांच्या पसंतीसही उतरतात. दरम्यान, अमिताभ यांनी आपला मुलगा अभिषेक बच्चन याच्यासाठी नुकताच एक ब्लॉग लिहिला आहे. जो चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिषेक बच्चन लवकरच ‘दसवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक यातील अभिषेकचा अभिनय पाहून त्याचे कौतुक करत आहेत. या संदर्भातच अमिताभ यांनी आपल्या मुलावर ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी लिहिले की, “एका वडिलांसाठी आपल्या मुलांचं यश अनुभवण्याशिवाय वेगळा आनंद काय असू शकतो, मुलाचं नाव प्रसिद्ध होताना पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अभिषेकचा वडील म्हणून मला लोकांनी ओळखणं आणि अभिषेकने ही अशी ओळख अनुभवण्याची संधी मला देण हे मी माझं भाग्य समजतो”.

“मी खूप अभिमानाने हे सांगू शकतो की अभिषेक माझा उत्तराधिकारी आहे, त्याचे प्रयत्न आणि वेगवेगळ्या भूमिकांना करण्याचा ध्यास, कठीण भूमिकाही सहज पेलण्याची त्याच्यातली धमक,-हे केवळ एक आव्हान नाही तर एक आरसा देखील आहे, सिनेमाचं विश्व, अभिनेता म्हणून त्याच्यातील क्षमता आणि त्याची विश्वासार्हता, दृढता आत्मसात करण्यासाठी” असं अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, ‘दसवी’ चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, ही एका दबंग बंदिवान नेत्यापासून शिस्तप्रिय नागरिक बनण्याविषयीची कथा आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन व्यतिरिक्त अभिनेत्री यामी गौतम आणि नम्रत कौर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट 7 एप्रिलला OTT प्लॅटफॉर्म Netflix तसेच Jio सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.