मुंबई : ‘काही लोक सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल करतात आणि पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत असतात. हे पाहून वाईट वाटते. पण, सोशल मीडियाने ट्रोलर्सना काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे,’ अशा शब्दांत ’83’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपली व्यथा मांडली आहे.

या मुलाखतीत कबीर खान म्हणाले, “सध्याच्या काळात सोशल मीडियावर लोक कसेही व्यक्त होतात. दहा वर्षांपूर्वी लोक असे वागत नव्हते. शब्दांचा वापर जबाबदारीने केला जात होता. आज लोकांना जबाबदारीचे भान राहिले नाही. याचे वाईट वाटते पण हेच सत्य आहे. सोशल मीडियावर सकारात्मकतेपेक्षा नकारत्मकता भरली आहे”

“माझे नाव खान आहे आणि यासाठीच मला पाकिस्तानात जा असे म्हटले जाते. मी एकदा पाकिस्तानात गेलो होते. तर तिकडे लष्कर ए तैय्यबा ने मला भारतात परत जाण्यास सांगितले. त्यामुळे मी इकडचाही नाही आणि तिकडचाही नाही. पण प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याचे आपले स्वत:चे वेगळे अस्तित्व असले पाहिजे. आम्ही कधी कधी चित्रपटात तिरंगाही दाखवतो.” परंतु, आता देशभक्ती आणि राष्ट्रवाद यामध्ये मोठे अंतर पडल्याची भावना खान यांनी व्यक्त केली.