मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने एक नवीन वादाला तोंड फुटलेले दिसत आहे. चित्रपटावरुन जोरदार राजकारणही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री होण्यावरून भाजपवर निशाणा साधला होता. यानंतर आत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटावरुन भाजपसह मोदी भक्तांना जोरदार टोला लगावला आहे.

सामना वृत्तपत्रातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, “प्रत्येक मोठ्या माणसाचा कमीत कमी एक चमचा असायलाच हवा. भाट, भांड, तोंडपुंजे त्यातूनच निर्माण झाले. पंतप्रधान मोदी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट आवडल्याचे जाहीर करताच देशभरातील भक्तांनी ‘द कश्मीर फाईल्स’ला फक्त ‘ऑस्कर’ पुरस्कार द्यायचेच बाकी ठेवले. मोदींनी ‘द कश्मीर फाईल्स’चा प्रचार सुरू करताच देशभरातील त्यांचे भक्त या चित्रपटाचे पोस्टर चिकटविण्याच्या कामास लागले. ही चमचेगिरीच्या अधःपतनाची हद्द असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.”

“चमचेगिरीचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून आहे. रशिया-युक्रेन युद्धात आपले पंतप्रधान मोदी यांना कसे ओढायचे यावर भक्त मंडळीत प्रचंड खल झाला असावा. शेवटी एक दिवस भक्तांच्या वृत्तवाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर बातम्या झळकल्याच. मोदी यांनी पुतीन व बायडेनशी तब्बल एक तास चर्चा केली. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी फोन करून मोदींकडे मदत मागितली. मोदी यांनी म्हणे पुतीन व बायडेन यांना संयमाने घेण्याचा सल्ला दिला. मोदी यांचा सल्ला दोघांनी मानल्याचेही प्रसारित झाले.”

“पण सत्य असे की, पुतीन यांनी युक्रेन पूर्ण बेचिराख केले आहे. पुतीन व बायडेन हे मोदींच्या ऐकण्यातले होते, मग दोघांत युद्ध का पेटले? यावर भक्त व चमच्यांचे म्हणणे असे की, ‘‘युद्धाला तोंड फुटले तेव्हा मोदी हे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारात दंग होते. त्यामुळे त्या दोघांचा मोदींशी संपर्क होऊ शकला नाही!’’ ही सरळ सरळ चमचेगिरी आहे”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.