Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान !

समृद्धीच्या ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंती कोसळण्याचे सत्र सुरूच

0

Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg :- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी सुरु असलेल्या ब्लास्टिंगमुळे इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील घरांच्या भिंती कोसळणे आणि घरांना तडे जाण्याचे प्रकार सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबधित कंपनीने तातडीने नुकसानभरपाई न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा धामणीकरांनी दिला आहे.

गत तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन पडझड होत आहे. धामणीजवळ समृद्धीच्या कंट्रोल ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना सतत हादरे बसत आहेत. सोमवारी (दि. ९) सकाळी साडे नऊच्या सुमारास येथील धनाजी भोसले यांच्या घराची भिंत पडली.

सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी गावत भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केमिकल ब्लास्टिंग देखरेखीखाली करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते.

मात्र कंपनी तसे न करता कंट्रोल ब्लास्टिंग सुरूच ठेवत आहे. येथील नागरिकांच्या नुकसान भरपाईच्या मागण्याही केवळ कागदावरच आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी धामणी येथील ९६ घरांना तडे जाऊन नुकसान झाले आहे. ते नागरिकही भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान भरपाईची मागणी मान्य न केल्यास या घरांतील महिलांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, गेल्या दहा दिवसांपूर्वीच ब्लास्टिंगमधून उडालेला भला मोठा दगड एका नऊ वर्षीय बालिकेजवळ येऊन पडला. सुदैवाने यात बालिका बालंबाल बचावली. तरी देखील कंपनीकडून वारंवार ब्लास्टिंग करत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

ब्लास्टिंग करण्यापूर्वी दवंडीद्वारे ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना दिल्या जातात, मात्र नागरिक घर सोडून जात नाहीत, अनेकांना मोबदला म्हणून भाडे दिले जाते, काही घरमालकांना नुकसान भरपाईदेखील दिलेली आहे, असे कंपनी व्यवस्थापनाने सांगितले.

मात्र, प्रत्यक्षात तसे नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कंपनीकडून खबरदारी घेतली जात असती तर ९६ घरांमधील रहिवासी नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत असते का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.