मुंबई : IPL 2022 चा सलामीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गतविजेत्या चेन्नई सुपर यांच्यात 26 मार्च रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई आणि धोनीचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
चेन्नई टीमच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. दीपक चाहर, ऋतुराज गायकवाड पाठोपाठ आता आणखी एक स्टार खेळाडू पहिला सामना खेळणार नाही.
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) प्रमुख खेळाडू मोईन अलीला व्हिजा मिळत नसल्याने संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. मात्र, त्याच्या कागदपत्रांवर काम सुरू असून बीसीसीआयही यामध्ये मदत करत आहे. मोईन अली लवकरच भारतात येईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे. मोईन अलीने व्हिसाची कागदपत्रे पूर्ण होताच फ्लाइट पकडण्याचेही सांगितले आहे.
या प्रकरणावर चेन्नईच्या सीईओने सांगितले आहे की, “त्यांनी 28 फेब्रुवारी रोजी त्याच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. अर्ज सादर होऊन 20 दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तो भारताचा वारंवार प्रवास करत आहे आणि तरीही त्याला प्रवासाची कागदपत्रे मिळालेली नाहीत. आम्हाला आशा आहे की तो लवकरच संघात सामील होईल. कागदपत्रे मिळाल्यानंतर तो लगेच भारताकडे वळणार आहे. आम्हाला मदत करण्यासाठी बीसीसीआयही पुढे आली आहे. सोमवारपर्यंत कागदपत्रांची कामे पूर्ण होतील अशी अशा आहे.”