महाराष्ट्रातुन धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडीत थांबा देण्याची मागणी, केव्हा धावणार ट्रेन ?
Maharashtra Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस या भारतीय बनावटीच्या ट्रेनने भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलून काढला आहे. ही गाडी रेल्वेच्या ताफ्यात आल्यापासून लोकांचा शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसवरुन मोहभंग होऊ लागला आहे.
वंदे भारत ट्रेनला शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसपेक्षा अधिक प्रेम आणि प्रतिसाद मिळू लागला आहे. वंदे भारत ट्रेनचा प्रवास भल्याभल्यांना आवडू लागला आहे. ही गाडी सध्या स्थितीला देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर धावत आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला सहा वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदूर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये राज्याला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान देखील वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे.
त्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. तथापि, ही गाडी या मार्गावर केव्हा सुरू होणार याबाबत रेल्वे कडून कोणतीच माहिती पुरवण्यात आलेली नाही.
परंतु पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गाडी लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे.
दरम्यान ही गाडी सुरू झाल्यानंतर या गाडीला सांगली आणि किर्लोस्करवाडी मध्ये थांबा दिला पाहिजे अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे. राजधानी मुंबईला पश्चिम महाराष्ट्रासाठी कनेक्ट करणे हेतू ही गाडी सुरू केली पाहिजे अशी मागणी प्रवाशांची आहे.
ही गाडी कोल्हापूर, मिरज, साताऱ्यासह सांगली, किर्लोस्करवाडीला थांबा दिला पाहिजे अशी मागणी प्रवासी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. प्रवासी संघटनांनी असं म्हटलं आहे की जर या गाडीला या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मिळाला नाही तर कमी तिकीट विक्री होईल आणि भविष्यात ही गाडी सुरू झाल्यानंतर लगेचच बंद पडेल.
तसेच या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा दिला तर या गाडीसाठी 80 टक्के तिकीट विक्री होऊ शकते, असा विश्वास प्रवासी संघटनेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. यामुळे मुंबई-कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर या ट्रेनला खरंच या स्थानकावर थांबा मिळणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
यासोबतच भोपाळ ते बेंगलोर दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनला देखील सांगली येथे थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.